नवी मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका भाजीपाला उत्पादनाला बसला आहे. परिणामी भाजीपाल्याची आवक 50 टक्क्यांनी घटली असून दर दुपटीने वाढले आहेत. तसंच पुढील महिन्यातही दर चढेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नवी मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये दररोज भाजीपाल्याच्या 700 ते 750 गाड्यांची होणारी आवक सध्या 400 ते 450 गाड्यांवर आली आहे. आवक घटली असल्याने भाजीपाला दर दुपटीने वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये 30 ते 40 रुपयांना मिळणारी भाजी आता 90 ते 150 पर्यंत जाऊन पोहोचली आहे.
नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे भागात पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ग्राहकांनाही महाग भाजीपाला खावा लागत आहे. महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातही पावसाचा फटका बसल्याने पुढील एक महिना तरी भाजीपाला दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
भाजी प्रति किलो दर
1) वांगी - 60 ते 70 रुपये
2) दोडका - 80 ते 90 रुपये
3) कार्ली - 100 ते 110 रुपये
4) शेवगा 120 ते 120 रुपये
5) कोबी - 70 ते 80 रुपये
6) फ्लॉवर - 110 ते120 रुपये
7) गाजर - 80 ते 90 रुपये
8) काकडी - 50 ते 60 रुपये
9) वटाणा - 150 ते 170 रुपये
10) टोमॅटो - 50 ते 60 रुपये
भाजी प्रती जुडी
1) कोथिंबीर - 30 ते 40 रुपये
2) मेथी - 30 ते 40 रुपये
3) पालक -25 ते 30 रुपये