मुंबई: ईडीने हा फुटबॉलचा खेळ सुरू केला आहे, आता हाफ टाईम झाल्यानंतर बघुयात काय होतंय ते असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. दोनच दिवसांपूर्वी ईडीने उद्धव ठाकरेंचे मेव्हणे आणि आदित्य ठाकरेंचे मामा श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत त्यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. त्यावर आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


आदित्य ठाकरे म्हणाले की, "ज्या-ज्या ठिकाणी सहा ते आठ महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ हा केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे. मग त्यानंतर विरोधकांची बदनामी केली जाते. फुटबॉलचा हा खेळ आहे, हाफ टाईम झाल्यानंतर बघूयात."


आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून बदनामी आणि कुणाला तरी ठरवून लक्ष्य केलं जात आहे, हे महाराष्ट्रात या आधी कधीही झालं नव्हतं. इतर राज्यातही इतकी खालची पातळी गाठली नव्हती. इतरांना बदनाम न करता त्यांनी चांगलं काम करावं. राजकीय शत्रूत्व हे वेगळं आहे, पण एकमेकांच्या परिवारावर कधीही चिखलफेक करण्यात आलं नाही. पण कुठे ना कुठे कायद्याचं राज्य, नियम असायला हवेत.


युवकांनी राजकारणात यायचं ठरवलं तर का यावं? कुणाला बदनाम करायला जायचं की बदनाम व्हायला जायचं की लोकांची सेवा करायला जायचं याचा विचार करावा असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 


दोनच दिवसांपूर्वी श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. 


काय आहे प्रकरण? 
अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.