मुंबई : मुंबईतील आरे कॉलनीत झालेल्या 21 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बर्थडे पार्टीनंतर झालेल्या हत्येचं गूढ उकलण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही. आरे कॉलनीतील तलावाजवळ अथर्व शिंदेचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला होता.
रविवारी संध्याकाळी आरे कॉलनीतील रॉयल पाम्समधील बंगला क्रमांक 212 भाड्यावर घेऊन तरुणीने आपली बर्थडे पार्टी आयोजित केली होती.
अथर्वचा मृत्यू झाला, त्या रात्री वाढदिवसाच्या पार्टीत हजर असलेल्या बारा तरुण-तरुणींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये बर्थडे गर्लचाही समावेश असून संबंधित तरुणी एका प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्मात्याची मुलगी असल्याची माहिती आहे. भाड्याने घेतलेल्या बंगल्याच्या केअरटेकर आणि स्टाफलाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
ताब्यात घेण्यात आलेले सर्व तरुण उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. पार्टीला आलेल्या बहुतांश तरुणांनी मद्यपान किंवा ड्रग्सचं सेवन केलं होतं, असं त्यांच्या कुटुंबीयांनीच सांगितलं आहे. मयत अथर्व शिंदेचे वडील नरेंद्र शिंदे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागात कार्यरत आहेत.
अथर्वने पुण्यातून साऊण्ड इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर तो घरुनच काम करायचा. अर्थव आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
पार्टीतील सर्वांना अथर्व ओळखत नव्हता, मात्र त्या रात्री अथर्व इतरांसोबत बंगल्यावरच राहिला. पार्टीमध्ये तरुणांमध्ये मोठी वादावादी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये अथर्व पार्टी असलेल्या बंगल्यातून धावत बाहेर पडत आहे, तर काही तरुण त्याच्या मागे लागल्याचं पाहायला मिळत आहे. बंगल्यापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या तलावाजवळ अथर्वचा मृतदेह आढळला होता. अथर्वला मुका मार लागला असून मृतदेहावर काही जखमा आढळल्या आहेत.
अथर्व शिंदे हत्या प्रकरणी बर्थडे गर्लसह 12 जण ताब्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 May 2018 10:55 AM (IST)
आरे कॉलनीतील अथर्व शिंदे हत्या प्रकरणी वाढदिवसाच्या पार्टीत हजर असलेल्या बारा तरुण-तरुणींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -