मुंबई : शारीरिक संबंध न ठेवल्यास जादूटोण्याच्या मदतीने कुटुंबीयांना मारून टाकतो अशी धमकी देत  भोंदू बाबाने एका महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आरे कॉलनी परिसरात उघडकीस आला आहे. तंत्रमंत्राच्या साहाय्याने पतीचा आजार बरा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने 37 वर्षीय महिलेचा बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने पीडित महिलेच्या 14 आणि 16 वर्षांच्या मुलींचाही विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. राजाराम रामकुमार यादव (वय 43) असं त्या भोंदू बाबाचं नाव आहे.


अत्याचाराला विरोध केल्यास कुटुंबीयांना जादुटोण्याच्या मदतीने कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी भोंदूबाबने महिलेला दिली होती. याप्रकरणी आरे पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या अंतर्गत भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला आहे.


आरोपीने पीडित महिलेच्या 14 आणि 16 वर्षांच्या मुलींना जंगलामध्ये नेऊन त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांचा विनयभंग केला. यावेळी आरोपीने लवंग आणि फुले फिरवून मंत्र जाप केला. तसेच पीडित मुलींना अश्लीलरित्या स्पर्शही केला. 


पोटदुखीचा त्रास बरा करण्यासाठी शारीरिक संबंध


पीडित महिलेच्या पतीला डोकेदुःखीचा त्रास होत असल्याने तो या भोंदूबाबाकडे गेला होता. त्यावेळी भोंदूबाबाने दिलेल्या औषधांमुळे तो बरा झाल्याचा त्याचा समज झाला. त्यामुळे पत्नीला ज्यावेळी पोटदुखीचा त्रास सुरू झाला त्यावेळी पतीनेच तिला त्या भोंदूबाबाकडे नेलं होतं. 


दोन मुलींचाही विनयभंग केला


पोटदुखी बरी करण्यासाठी शारीरिक संबंध करावे लागतील असं सांगत त्या भोंदूबाबाने पत्नीला भूल घातली आणि बलात्कार केला. त्यानंतर पुढचे पाच वर्षे सातत्याने तिच्यावर बलात्कार करत राहिला. नंतर तिच्या दोन्ही मुलींचाही विनयभंग केला. यावेळी 16 वर्षीय मुलीने त्याला विरोध केल्यानंतर भोंदूबाबाने त्या महिलेच्या पतीचा मृत्यू होईल अशी भीती घातली.


एनजीओच्या मदतीने पोलिसांत गुन्हा


या प्रकाराला कंटाळून त्या पीडित महिलेने एका सामाजिक संस्थेकडे धाव घेतली असता हा सगळा प्रकार पुढे आला.  एनजीओच्या माध्यमातून आरे पोलिस ठाण्यात भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 


कोरोना काळात 2020 मध्ये टाळेबंदी झाल्यापासून आरोपी पीडित महिलेला धमकावत होता. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. आरोपीने या सारखे आणखी गुन्हे केले आहेत का याची चौकशी पोलिस करत आहेत.


ही बातमी वाचा: