विशेष म्हणजे ज्या रॉयल पाल्ममधल्या जागेसाठी आग्रह केला जातोय, त्या जागेवर सध्याच्या प्रस्तावित जागेपेक्षा जास्त झाडं आहेत. मग कमी झाडांच्याऐवजी जास्त झाडं तोडण्याचा हट्ट का केला जात आहे असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा विरोध हा खाजगी विकासकांच्या फायद्यासाठी केला जातोय का असाही सवाल उपस्थित होतो आणि आरे बचावचा नारा देणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचा दुटप्पीपणाही याच पत्रांमधून उघड झाला आहे.
मेट्रो कारशेडवरुन पर्यावरणप्रेमींची अजब भूमिका, फुकटची सोडून विकतच्या जागेसाठी आग्रह!
एकीकडे रॉयल पाल्म आपली जमीन कारशेडसाठी देण्याच्या बदल्यात शासनाकडून वाढीव एफएसआयची मागणी करत आहेत तर, स्वयंसेवी संघटना मात्र, रॉयल पाल्मची जमीन अगदी फुकटातच राज्य सरकारला मिळणार असल्याचा आभास निर्माण करत आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली खाजगी विकासकांचं अर्थकारण दडल्याचं आता समोर येत आहे.
आरे बचाव घोषणेमागे काहींचे छुपे मनसुबे, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप
आरेतली वृक्षतोड थांबवण्यासाठी आरे बचावची मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र, आरे बचावच्या घोषणांमागे आणखीही काही मनसुबे लपले आहेत, असा आरोप खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा आरोप नेमका का केला? आणि आरे बचावच्या घोषणांमागे खरोखरच फक्त पर्यावरणाविषयीची तळमळ आहे की कुणाचं खासगी हित साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचा शोध घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाच्या टीमने केला. त्यामध्ये या मोहीमेविषयीचे विविध पैलू समोर आले.
आरे वाचवाच्या हाकेला ओ देण्यासाठी दर रविवारी आरे कॉलनीत अनेक मुंबईकर एकत्र येतात. मुंबईतली वनसंपदा जिवंत रहावी हा उद्देश घेऊन अनेक शाळकरी मुलं, तरुण-तरुणी आणि वयस्कर आजी-आजोबाही या आरे बचावच्या दिंडीत सामिल होतात. परंतु मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्यामुळे ज्यांनी आरे बचावचा नारा दिला आहे, त्या स्वयंसेवी संघटनांच्या उद्देशावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.