मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मोबाईल कॉलिंग प्रकरणी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसेंचा राजीनामा घेऊन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केली आहे.
“अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पत्नीचा मोबाईल हॅक केल्यानंतर, त्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय नंबर आढळले. त्यामध्ये खडसेंचा नंबरही आहे.” असा आरोप प्रीती मेनन यांनी केला आहे.
एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण
“माझ्या मोबाईल फोनसंदर्भात 'आप'ने केलेले आरोप बिनबुडाचे असून, सदर फोन गेल्या एक वर्षापासून वापरात नाही. शिवाय, फोन सुरू असण्याच्या काळात एकही आंतरराष्ट्रीय कॉल नाही. सेवा पुरवणाऱ्या कंपनीने तसे पत्राद्वारे कळवलं आहे.”, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलं आहे.
सदर नंबर आता जी कोणी व्यक्ती वापरत असेल, त्याचा तपास यंत्रणेने करावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे खडसेंनी केली आहे.
मात्र आता खडसे खोटं बोलत असून त्यांचा राजीनामा घेऊनच प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मेनन यांनी केली आहे. शिवाय, या प्रकरणी पोलीस गंभीर नसून पोलिसांनी आयडिया कंपनीकडून मोबाईल नंबरची माहिती का घेतली नाही, असा सवाल मेनन यांनी केला आहे.