मुंबई : मुंबईत पेंग्विन आणले म्हणून आजही आपल्यावर टीका होतेय. पण यावर मला एकच प्रश्न विचारायचा आहे. आम्ही पेंग्विन दाखवतो, तुम्ही भारतात आणलेले चित्ते दाखवा असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि सरकारला लगावला आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात मुख्यमंत्री नव्हते तर घटनाबाह्य व्यक्ती बसला होता. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे मुंबईची अवस्था वाईट झाल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने 'मुंबईचा आदित्योदय 2025' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. त्यामध्ये आदित्य ठाकरेंनी मुलाखत देत मुंबई महापालिका निवडणुकीचं व्हिजन मांडलं. यावेळी कोस्टल रोडच्या अपूर्ण कामावरुन आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसंच भारतात आणलेल्या चित्त्यांवरुनही आदित्य ठाकरेंनी सरकारला टोला लगावला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
शिवसेनेच्या माध्यमातून जे काम झालं ते आदित्योदय या कॅलेंडर मध्ये आलंय. महाराष्ट्र मध्ये साडे 11 हजार हेक्टर लँड आपण कांदळवनात आणले.
EV पॉलिसी 2021 आणली त्यावेळी जगात नेमकं काय सुरु आहे याचा विचार केला गेला. महाराष्ट्रासाठी 2025 मध्ये 10 टक्के इलेक्ट्रिक व्हेइकल गाड्या असायला हव्यात असा आम्ही ठरवलं होतं. 2023 पर्यंत 9.1 टक्के गाड्या या इलेक्ट्रिक व्हेइकल होत्या. इलेक्ट्रिक व्हेइकल या परवडणाऱ्या आहेत.
कोस्टल रोड प्रोजेक्टवर काय म्हणाले आदित्य ठाकरे?
सन 2017 ला आम्ही कोस्टल रोडचे भूमिपूजन केलं. महिन्याला आम्ही त्याचा आढावा घेत होतो. 2023 ला आम्ही कोस्टल रोड पूर्ण करणार होतो. पण सरकार पडलं आणि नवं सरकार आलं. सी लिंकला जोडणारा रस्ता अजून पूर्ण झालेला नाही. त्यात टनेलमध्ये कोस्टल रोड गळायला लागला. भ्रष्ट सरकारमुळे याची सर्फेसिंग घाणेरडी झाली आहे.
मराठीसोबत तीन ते चार भाषा शिका
मराठी आलीच पाहिजे त्यासोबत जेवढ्या भाषा शिकता येतील तेवढ्या आपण शिकल्या पाहिजे. आपल्याला तीन ते चार भाषा यायला पाहिजेत. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. मी आणि आजोबा एकमेकांना डिक्शनरी भेट द्यायचो. फ्रेंच भाषा शिकायाला त्यांनी मला प्रोत्साहन दिलं.
बेस्ट बसने रोज 30 ते 34 लाख लोक प्रवास करतात. बेस्टला BMC ने फंड दिला पाहिजे. BMC हे MMRDA ला साडे 5 हजार कोटी देते. पण बेस्टला काहीही निधी देत नाही.
बाळासाहेब ठाकरे स्मारकावर काय म्हणाले आदित्य ठाकरे?
बाळासाहेब ठाकरे स्मारकची एक झलक आम्ही दाखवणार आहोत. त्याच्या पहिल्या फेजचं काम झालं आहे. हे स्मारक एक प्रेरणास्थान, शक्तिस्थान असणार आहे. अनेकांना त्यातून प्रेरणा मिळेल असा हे स्मारक असेल.
मुंबईतील बॅनरबाजी थांबवा
शहरात लागणाऱ्या बॅनरचा लोकांना कंटाळा आला आहे. आम्ही बॅनर लावणार नाही, तुम्हीही लावू नका असं मी मुख्यमंत्र्यांना परत सांगणार आहे. आता निवडणुका झाल्या तुमच्या होर्डिंग लावायची गरज नाही. तुम्ही केलेली कामं सोशल मीडियातून पोहोचवा.
बीडीडी चाळ 100 वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यातील साडे पाच हजार कुटुंबांना आम्ही 500 स्क्वेअर फुटांची घरं देणार आहोत. हा आगळा वेगळा प्रोजेक्ट आहे.
मुंबईमध्ये या पुढचे आव्हान हे घरांचे असणार आहे. मुंबई अदानी गिळायला आले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या राजकारणावर लक्ष दिल्यास आर्थिक शक्ती हलवायला एक शक्ती काम करतेय असं दिसतंय. आम्ही काम करून दाखवली आणि लोकांसमोर मांडली. खोटी आश्वासनं आमच्याकडून कधीच दिली गेली नव्हती.
आम्ही कुणालाही थांबवणार नाही
आम्ही कोणालाही थांबण्याचा प्रयत्न करणार नाहीत आणि पुढेही करत नाही. स्वार्थी लोक जे सगळं काही मिळून सोडून जात आहेत. ज्यांना महाराष्ट्राची, मराठी माणसांची पडली नसेल त्या लोकांना आम्हाला सोबत ठेवण्यात इंटरेस्ट नाही.
... तर देवेंद्र फडणवीसांना भेटत राहू
फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री असताना असे अनेक काम असतात जे ते करू शकतात. ज्यांना वाटतं आम्ही फडणवीसांना भेटू नये त्यांना अजून राजकारण कडू करायचा आहे का? राज्यासाठी चांगलं होत असेल तर ओपनली आम्ही भेटत राहू. ज्याला सपोर्ट करायचा त्याला पाठिंबा देऊ. ज्याला विरोध करायचा त्याला विरोध करू. गेल्या अडीच वर्षात राज्यात मुख्यमंत्री बसले नव्हते, तर घटनाबाह्य व्यक्ती बसला होता.