मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीकरता मनसे-भाजप युती चाचपणीच्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभेत शिंदेंच्या नकारघंटेनं मनसेची युती होऊ शकली नाही. मात्र आता महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा आणि युतीतील इतर बाबीवर वाटाघाटी करण्यासाठी मनसेकडून एका टीमची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे.
मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांची टीम सध्याची राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यावरुन युतीबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
विधानसभेला शिंदेंमुळे युती झाली नाही
विधानसभा आणि लोकसभेतही मनसे युती करण्यास तयार असताना आणि भाजपचाही ग्रीन सिग्नल असताना शिंदेंमुळे मनसेच्या युतीचा रस्ता ब्लॉक झाला होता. मात्र विधानसभेत मनसे आणि शिंदेंचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्यानं काही जागांवर दोघांचेही नुकसान झाले. अनेक ठिकाणी याचा ठाकरेंना फायदा झाला. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा युती करण्याच्या बाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत युती शक्य
हिंदुत्वाचा मुद्दा आणि नरेंद्र मोदींचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसेनं भाजपसोबत युती करायची ठरवल्यास ते शक्य होणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंसोबत मनसेचे युतीचे दोर आधीच कापले गेलेत. दोन्ही पक्षांना एकमेकांवर विश्वास नाही अशी स्थिती असल्यानं आता भाजपच मनसेसमोरील युतीचा पर्याय असल्याची चर्चा आहे.