Aaditya Thackeray On Eknath Shinde Ayodhya Visit : "हे कलियुग आहे. रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत," अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Visit) टीका केली आहे. आदित्य ठाकरे मुंबईत (Mumbai) बोलत होते.  


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे उद्या 8 एप्रिल रोजी खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहेत. ते उद्या लखनऊमध्ये उतरतील. शिंदे यांच्या सोबत सुमारे 3 हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल होणार आहेत. 


'आम्ही महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य आणू'


याविषयी विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले की, "आता कलियुग आहे. रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण आम्ही महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य आणू." महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळी आदित्या ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र अयोध्या दौऱ्यावर गेले होते.


मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत राम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी झाली आहे. शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आधीपासूनच अयोध्येत दाखल झाले असून ते या दौऱ्याची वातावरण निर्मिती करत आहेत. तर शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी करण्यासाठी उत्तर प्रदेशातील नेत्यांप्रमाणे भाजपचे महाराष्ट्रातील नेतेही मैदानात उतरले आहेत. भाजपने गिरीश महाजन, आशिष शेला या दोन नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे.


शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते, भाष्य करणार नाही : आदित्य ठाकरे


दरम्यान हिंडनबर्ग प्रकरणात उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही, जेपीसीची मागणी करणं चुकीचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं. त्यावरुन विरोधकांमध्ये फूट पडताना दिसत आहे का, असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी अधिक भाष्य करायचं टाळलं. "शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही," असं आदित्य ठाकरे म्हणाले. 


VIDEO : CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा कसा असणार?