मुंबई : फुटबॉलचे देव आजवर आपण फक्त टीव्हीवर पाहिले आहेत किंवा वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल वाचलं आहे, पण येत्या 27 एप्रिलला त्याच देवांची पावलं भारताची क्रीडा पंढरी म्हणून नावारुपाला येत असलेल्या नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमला लागणार आहेत.


शिवसेना नेते आणि महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना आणि ज्युवेंट्स या दोन दिग्गज क्लब्जमध्ये फुटबॉलचा सामना आयोजित करण्यात आला आहे. फुटबॉल स्टार लिओनल मेस्सीने आपला ऑटोग्राफ असलेली बार्सिलोना क्लबची जर्सी आदित्य ठाकरेंसाठी पाठवली आहे.

भारतात फुटबॉलचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, यासाठी या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 27 एप्रिलला नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

कोण कोण येणार?

बार्सिलोना आणि ज्युवेंट्स या दोन्ही संघांत फार मोठी नावं आहेत. फिफा विश्वचषकात खेळलेले अनेक दिग्गजही दिसणार आहेत. यात बार्सिलोना संघातील डेव्हिड ट्रेझग्युट, एडगर डेव्हिड, पाओलो मोण्टेरो, मार्क लुलिआनो, फॅब्रिझिओ रावानेली यासारखे अनेक स्टार खेळणार आहेत. तसेच ज्युवेंट्समधून युआन कार्लोस रॉड्गेज, जुलिओ सालिनास, जोस एडमिलसनसह अनेक दिग्गज मुंबापुरीत येतील.

मेस्सीकडून आदित्य ठाकरेंना जर्सी भेट

बार्सिलोनाचे दिग्गज लवकरच भारत भेटीवर येत आहेत. पण त्यापूर्वी हा संस्मरणीय सामना आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना प्रेमाचे प्रतिक म्हणून फुटबॉल स्टार लिओनल मेस्सीने आपला ऑटोग्राफ असलेली बार्सिलोना क्लबची जर्सी पाठवली आहे.

आदित्य ठाकरेंच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यावेळी संवाद साधला. फुटबॉलला भरभरुन प्रतिसाद देण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं.

ज्या युरोपियन संघांचा खेळ पाहण्यासाठी भारतीय चाहते रात्र-रात्र जागवतात, त्याच बार्सिलोना आणि युवेंटस संघाच्या रथी-महारथी खेळाडूंचा खेळ याचि देहि याचि डोळा पाहण्याचं भाग्य मुंबईकरांना मिळणार असल्याची माहिती क्रीडा संघटक आणि डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वेसर्वा डॉ. विजय पाटील यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारताने दमदार आणि स्फूर्तीदायक कामगिरी करुन सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यामुळे भारतात फुटबॉलच्या विकासाला एक वेगळी चालना मिळाली होती. फुटबॉलची क्रेझ वाढावी म्हणून आता फुटबॉल नेक्स्ट फाऊंडेशनचे संस्थापक कौशिक मौलिक यांनी भारतात फुटबॉलच्या देवांना खेळवण्याची आपली कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. हा केवळ एक सामना नसून भारतीय क्रीडा विश्वासाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.