Mumbai Crime : रेल्वेत (Railway) तिकीट तपासनीस पदाची नोकरी लावून देतो अशी बतावणी करत सुशिक्षित बेरोजगार तरुणाला तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना मुंबईत (Mumbai) घडली आहेत. विक्रोळीच्या पार्क साईट पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुरेश आसारी असं आरोपीचं नाव आहे. त्याने संबंधित तरुणाला मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचे बनावट नियुक्तीपत्र देखील दिलं होतं.
काय आहे प्रकरण?
विक्रोळीत पार्क साईट परिसरामध्ये राहाणाऱ्या धनश्री वायंगणकर यांचा मुलगा निलेश नोकरीच्या शोधात आहे. धनश्री यांचे पती आणि मुलगा दोघेही टेम्पो चालकाचे काम करतात. धनश्री यांच्या पतीला त्यांच्या मित्राने सुरेश आसारी याच्याशी ओळख करुन दिली. सुरेश हा अस्खलित इंग्रजी बोलतो आणि आधी रेल्वेमध्ये कंत्राटी पार्सल कंपनीमध्ये कामाला होता. या व्यक्तीने तुमच्या मुलाला रेल्वेत टीसीची नोकरी मिळवून देईन, असं आश्वासन धनश्री वायंगणकर यांना दिलं होतं. या कामासाठी दहा लाख रुपये लागतील असंही त्याने सांगितलं होतं. वायंगणकर कुटुंबाने कसे बसे तीन लाख रुपये जमा करुन तीन लाख सुरेशला दिले. सुरेशने त्यांच्या मुलाला मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचे नियुक्तीपत्र देखील दिलं. या पत्राची शहानिशा करण्यास जेव्हा वायंगणकर कुटुंब सीएसएमटी इथल्या रेल्वेच्या कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना हे पत्र बनावट असल्याचे समजलं. एवढंच नाही तर सुरेशही पैसे घेऊन बेपत्ता झाल्याचे समोर आलं.
यानंतर वायंगणकर कुटुंबाने पार्क साईट पोलिसांत याबाबत तक्रार दिली. आरोपी सुरेश आसारी हा सायन इथे एका कुरियर कंपनीमध्ये हा कामाला असल्याची माहिती पार्क साईट पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी त्याता पकडण्यासाठी सापळा रचला आणि सायनमधील कंपनीत जाऊन त्याला बेड्या ठोकल्या. अशाप्रकारे लोकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी सतर्क रहाण्याचे नागरिकांना आवाहन केलं आहे.
नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची फसवणूक
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या आमिषाने फसवण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सरकारी खात्यात नोकरी लावतो. नामांकित कंपनीत नोकरी मिळवून देतो अशी विविध कारणं सांगून तरुणांना फसवलं जात आहे. हे तरुण देखील नोकरीच्या आशेने या भूलथापांना बळी पडतात. नोकरी मिळेल या आशेपोटी तरुण आरोपींच्या जाळ्यात अडकतात आणि मग आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे अनेकांनी नोकरी गमावली, बेरोजगारी वाढली. परिणामी त्याचा फायदा उठवणारी संख्या वाढली आहे. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येतं.