Mumbai Firecrackers Ban : कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी सण उत्साहात साजरे केले जात आहेत. दिवाळी (Diwali 2022) सण अगदी तोंडावर आला आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, दिव्याचा उत्सव. दिवाळीत मोठ्या प्रमाणाता फटाके (Firecrackers) फोडले जातात. यंदा दिवळीचा उत्साह फारच जास्त असून फटाक्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी केल्याचं दिसतं. परंतु मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) फटाक्यांच्या विक्रीबाबत आदेश जारी करत विनापरवाना फटक्यांच्या विक्रीर बंदी घातली आहे.


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईत (Mumbai) आता फटाके विकता येणार नाहीत. मुंबई पोलिसांनी परवानगीशिवाय फटाके विकण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. परवाना नसलेल्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या आदेशात म्हटलं आहे. हा आदेश 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान लागू राहिल. 


दिवाळीच्या दरम्यान बाजारात फेरफटका मारल्यात अनधिकृत विक्रेत्यांकडून ठिकठिकाणी फटाक्यांची दुकानं लावलेली निदर्शनास येतात. परवाना नसताना करण्यात येणाऱ्या या फटक्यांच्या विक्रीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय या विक्रेत्यांकडे असलेल्या फटाक्यांच्या सुरक्षिततेबाबतही शाश्वती नसते. या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी विना परवाना फटाके विक्रेत्यांवर बंदी घातली आहे.


मुंबई पोलीस उपायुक्त संजय लाटकर (अभियान) यांनी जारी केलेल्या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे की, "जनतेला अडथळा, धोका किंवा नुकसान टाळण्यासाठी मुंबईच्या हद्दीतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीने फटाके विक्री करु नये. ज्यांच्याकडे फटाके विकण्याचा परवाना आहे, त्यांनाच फटाके विकण्याची परवानगी असेल.






 


आदेशात काय लिहिलंय?
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, "मुंबईत रस्त्यावर विनापरवाना फटाके विकण्यास प्रतिबंध आहे. फटाके विकणे, त्याचे प्रदर्शन भरवणे, हस्तांतर करणे, वाहतूक करणे यांवर पोलिसांकडून बंदी घातलेली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर आणि विना परवाना फटाके विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. बेकायदा फटाके विकताना संपूर्ण काळजी घेतली जात नाही, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो किंवा फटाके पेटल्यास आग लागून मोठं नुकसानंही होऊ शकतं.


बृहन्मुंबईच्या हद्दीत कोणालाही फटाके विकता येणार नाही. तसंच माहुल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलिअम, हिंदुस्तान पेट्रोलिअम बीडीयू प्लॉट एरिया, स्पेशल ऑईल रिफायनरी एरियाच्या 15 ते 50 एकर क्षेत्रात रॉकेट किंवा फटाके उडवू नयेत. हा निर्णय 16 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या काळात लागू असेल."


फटाके विक्रेते नाराज
परंतु मुंबई पोलिसांच्या या आदेशामुळे काही फटाके विक्रेत्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. आधीच कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्षे व्यवसाय ठप्प झाला असताना यंदा निर्बंधांशिवाय दिवाळी साजरी होत असताना मुंबई पोलिसांच्या नव्या आदेशामुळे फटक्यांची विक्री करण्यावरही निर्बंध आले आहेत.


VIDEO : Firecrackers Diwali 2022 : मुंबईत परवानगीशिवाय फटाके विक्रीवर बंदी, परवाना नसल्यास कारवाई