पालघर : पालघर जवळील नंडोरे आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत 30 विद्यार्थी  आणि एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अलिकडेच जव्हार हिरडपाडा येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने आश्रमशाळा सील केली आहे.


नंडोरे आश्रमशाळेत नववी ते बारावीचे वर्ग सुरु होते. काही विद्यार्थिनींना लक्षणे आढळून आल्यानंतर सुरुवातीला नऊ विद्यार्थींना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत पुढे आले. त्यानंतर 193 विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर एकूण 30 विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले असून एका शिक्षकालाही लागण झाली आहे.


या शाळेत 34 शिक्षक शिकवत होते. कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लागण मुलींना झाली आहे. या आश्रमशाळेतील 24 मुली कोरोना पॉझिटिव्ह असून सहा मुलेही कोरोनाबाधित आहेत. यातील नऊ मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगीकरण कक्ष स्थापन करुन वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.


कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर शाळा सुरु करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता. मात्र ग्रामीण भागात सुद्धा आश्रम शाळेतही सध्या कोरोनाची लागण होत असल्याचं उघड झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच पालघरच्या ग्रामीण भागातही सध्या कोरोनाची धक्कादायक आकडेवारी दिवसेंदिवस समोर येत आहे. त्यामुळे प्रशासन नेमके यावर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.