पालघर : डहाणू तालुक्यातील विवळवेढे (महालक्ष्मी) गावातील विवाहित महिला जयश्री बारक्या पवार ही महिला जव्हार येथील पतंगशहा उपजिल्हा रुग्णालयातून बेपत्ता झाली. जयश्री आणि बारक्या पवार या दाम्पत्याचे लग्न झाल्यापासून आठ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जयश्रीला दोन जुळ्या मुली झाल्या. कासा उपजिल्हा रुग्णालयात जयश्रीला बाळंतपणासाठी दाखल करण्यात आलं होतं. जुळ्या मुलींमधील एका मुलीचे वजन कमी असून तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मुलींना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आणि बारक्या पवारने पत्नी आणि मुलींना घेऊन जव्हार येथील पतंगशाह उपजिल्हा रुग्णालय जव्हार येथे हलवले.
मुलींना दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु केले. दरम्यान शनिवारी 10 ऑक्टोबर रोजी रात्री 9 च्या सुमारास पवार दांपत्य रुग्णालयाच्या बाहेर बसले होते. बारक्या पाणी आणण्यासाठी रुग्णालयात गेला आणि परत आल्यावर पाहिले तर जयश्री तिच्या जागेवर नव्हती. ती इथेच कुठेतरी असावी असा प्राथमिक अंदाज बांधत बारक्या तिची येण्याची वाट पाहू लागला परंतु बराच वेळ उलटून गेला तरीही पत्नी परत येत नाही म्हणून त्याने आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु अनोळखी जागा आणि त्यात रात्र असल्यामुळे झालेला
अंधारात तो पत्नीला शोधू शकत नसल्यामुळे त्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार लक्षात आणून दिला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलीसांनी तक्रार दाखल करण्यासाठी 24 तास पूर्ण असावे लागतात, 24 तास पूर्ण झाल्यावर जर जयश्री मिळाली नाही तर तुम्ही पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन घटनेची नोंद करावी, त्यांनतर पुढचा तपास आम्ही करतो, असे आश्वासन पोलिसांनी बेपत्ता महिलेच्या कुटुंबियांना दिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी बारक्या पवारने पुन्हा शोध सुरु केला असता, रुग्णालयाच्या बाजूला 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका छोट्या पण खोल असलेल्या तलावाजवळ बेपत्ता महिलेच्या अंगावरील शॉल आणि तिची चप्पल आढळून आली. त्यांनतर बारक्याने तिथल्या परिसरातील जाणकारांना घेऊन तलावात उतरून पत्नीचा शोध घेण्यास सुरुवात केली पण त्यातही तिचा पत्ता लागला नाही. म्हणून 12 ऑक्टोबरला पुन्हा पोलिसांना कळवले असता त्यांनी बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांनाच महिलेचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. असे उपस्थित नातेवाईकांचं म्हणणं आहे. तसेच सदर महिलेला मंगळवारी 13 ऑक्टोबर जव्हारजवळील कासटवाडी येथे पाहिल्याचा दावा तेथील एका वडापाव विक्रेत्याने केला आहे.
सदर घटनेसंदर्भात पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी सांगितले की, 'जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर महिलेच्या फोटोंसहित पोस्टर लावण्यात आले. सदर महिला आढळल्यास संपर्कासाठी ठाणे अमलदार आणि जव्हार पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक टाकण्यात आला आला आहे. तसेच पोलीस पाटीलांना सांगून प्रत्येक गावागावात व्हाट्सअँप ग्रुपला पोस्टर प्रसिद्ध केले आहेत.'