मुंबई : कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात मुंबईसाठी शुभसंकेत देणारी एक सकारात्मक बातमी आली आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये चक्क 5 ठिकाणी गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडले आहेत. 300 मीटर अंतरावर समुद्र असतानाही शिवतिर्थावर केवळ 6 ते 7 फुटांवर गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडणं ही मोठी बाब मानली जातेय. शिवाजी पार्कचे नुतनीकरण कामादरम्यान भुगर्भतज्ञांकडून परिक्षण करण्यात आले होते. या परिक्षणाअंतर्गत हे गोड्या पाण्याचे स्त्रोत आढळलेत.


शिवाजी पार्क आजवर अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार ठरलं आहे. ज्यानं अनेक दिग्गज खेळाडुंना घडताना पाहिलं त्या शिवाजी पार्कवर आणखी एक इतिहास घडतोय. पार्कमधल्या धुळीचा प्रश्न मिटवण्यासाठी दररोज पाण्याचे फवारे मारण्याची गरज होती. 24 एकराच्या शिवाजी पार्कवर यासाठी रोजचं 3 लाख लिटर पाणी लागतं. एवढं पाणी आणायचं कुठून? मग शोध सुरु झाला तो जमिनीखालच्या पाण्याचा.


शिवाजी पार्क नुतनीकरण प्रस्तावात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विशेष रस घेतला आहे. याआधी मनसेनंही शिवाजी पार्कमध्ये पाण्याचे फवारे उभारुन धुळीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण आता जवळपास 3 कोटी खर्चुन संपूर्ण शिवाजीपार्कचं रुपडं बदललं जाणार आहे. सोबतच, सापडलेल्या नव्या गोड्या पाण्याच्या स्त्रोतांमुळे धुळीच्या प्रदुषणाचा प्रश्नही कायमस्वरुपी मिटणार आहे.



  • शिवाजी पार्कच्या 24 एकरच्या परिसरात फवारण्यासाठी दररोज 3 लाख लिटर पाण्याची गरज आहे.

  • शिवाजी पार्कमध्ये 5 ठिकाणच्या एकूण 35 विहीरींमधून प्रत्येकी 25 हजार लिटर पाणी मिळू शकेल.

  • इथे केवळ  ७ फुटांवर गोडं पाणी लागलंय.

  • शिवाजी पार्कच्या या विहीरी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे सतत गोड्या पाण्यानं भरलेल्या राहतील अशी व्यवस्था होणार आहे.

  • अतिरीक्त पाणी आग विझवण्यासाठी, इलेक्ट्रीसीटी जनरेट करण्यासाठी वापरता येईल.


दादर परिसरात पूर्वीपासून 300 गोड्या पाण्याच्या विहीरी होत्या. शिवाजी पार्क हा जीवंत गोड्या पाण्याचे स्त्रोत देणारा वालुकामय प्रदेश आहे, यापूर्वी दादरच्या घराघरांमध्ये विहीरी होत्या. आता त्या क्राँक्रीटच्या जंगलात जमिनीखाली गाडल्या गेल्या. आता सापडलेल्या या नव्या विहीरींना समृद्ध करणं हे आपल्या हातात आहे.