Virar News Update : विरारमध्ये शनिवारी दिवसाढवळ्या झालेल्या हत्येप्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी सुदेश चौधरींसह नऊ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समय चौहान या तरूणाची शनिवारी हत्या झाली होती. विरार पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. विरार येथील बांधकाम व्यावसायिक निशांत कदम याच्या 2021 मध्ये झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी समय याची हत्या झाल्याचा आरोप समय याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मयत समर्जीत उर्फ समय चौहान याची शनिवारी विरार पूर्वेच्या डिमार्ट समोर श्रीकृष्ण फर्निचरच्या बाजूलाच भर रस्त्यात चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. समय याची हत्या करणारे शार्पशुटर होते, अशी माहिती समोर आली आहे. या दोघांनी दुचाकीवरून येऊन समय याच्यावर चार गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या समयच्या डोक्यावर तर दोन त्याच्या पोटात लागल्या होत्या. फायरींग करुन दोघे जण बाईकवर बसून जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मयत समयच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी शिवसेनेचे पदाधिकारी सुदेश चौधरी, निखिल कदम, सिध्दार्थ कदम, श्याम यादव, अनुराग पांडे, राज यादव, राहुल दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. विरार पोलिसांनी गोळीबार प्रकरणी सिध्दार्थ कदम आणि संजय धुरी या दोघांना अटक केली आहे.
"शिवसेनचा पदाधिकारी सुदेश चौधरी याच्या बंगल्यात समयच्या हत्येचा कट शिजला असून उत्तरप्रदेश मधील शार्पशुटरला समयला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली, होती असा आरोप समयच्या कुटुंबीयांनी केला आहे. याबरोबरच निशांत कदम याची सप्टेंबर 2021 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात समय चौहान हा मुख्य आरोपी असल्याचा आरोप निशांतच्या नातेवाईकांनी केला होता. त्यांनीच सुदेश चौधरीशी संगनमत करुन ही हत्या केल्याचा आरोप समय याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी सुदेश चौधरी यांनी आपल्याला राजकीय सुडापोटी गुंतवलं जात असल्याचे म्हटले आहे. निशांत कदम याच्या हत्येनंतर बदला घेण्याची ही मालिका अजूनही सुरु राहिल, असे वाटत असून या प्रकरणी आपल्याला राजकीय सुडापोटी गोवलं जात आहे. या प्रकरणात आपला काहीही सबंध नसल्याचे सुदेश चौधरी यांनी सांगितले आहे.
महत्वाच्य बातम्या
- Mumbai Corona Update : मुंबईत नव्या कोरोनाबाधितांची संख्या 100 च्या आत, रुग्णदुपटीच्या दरातही मोठी वाढ
- Mumbai Building Fire : मुंबईतील रॉयल पार्क परिसरातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
- Knight Frank Index: मुंबईत सरासरी 350 घरांच्या खरेदीसाठी नोंदणी; नाईट फ्रॅन्क इंडियाचा अहवाल
- हॉटेलमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह, वसईमधील घटनेने खळबळ