मुंबई : उन्हाळा असल्यामुळे शरीराला थंडावा मिळवण्यासाठी अनेक जण रस्त्यावरील ज्यूस किंवा बर्फाच्या गोळ्याचा पर्याय निवडतात. मात्र, या सरबतांमधला बर्फ तुमच्या शरीरासाठी अपायकारक ठरु शकतो. कारण मुंबईत रस्त्यावरील बर्फाचे 98 टक्के नमुने दूषित आढळले आहेत.


महापालिकेच्या तपासणीत हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे तयार करून विकणारे विक्रेते यांच्याकडून तपासणीसाठी बर्फाचे ४१० नमुने गोळा करण्यात आले होते. त्यापैकी ४०० म्हणजे ९८ टक्के नमुने दूषित आढळून आले आहेत.

या दूषित बर्फाच्या सेवनामुळे पोटाचे विकार, जुलाब, संसर्ग होण्याची शक्यता आहे. महिनाभरात १४ हजार ७०० किलो बर्फ नष्ट करण्यात आला आहे, तर शहरातील बर्फ तयार करणाऱ्या १५ कारखान्यांवर कारवाई करण्यात आल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.