डोंबिवली : सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्थानक अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत गर्दीमुळे बळी जाण्याचं सत्र सुरूच आहे. कोपर रेल्वे स्थानकाजवळ आज एका 30 वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. रजनीश सिंग असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.
रजनीश डोंबिवलीच्या गांधीनगर भागात राहणारा आहे. मुंबईत एका गाडीच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या रजनीशने आज सकाळी डोंबिवलीहून 8.40 ची सीएसएमटी फास्ट लोकल पकडली, मात्र लोकलला प्रचंड गर्दी असल्याने तो आत जाऊ शकला नाही, आणि दारातच लटकून उभा राहिला. मात्र कोपर रेल्वेस्थानकाजवळ लोकलने वेग घेताच रजनीशचा हात सुटला आणि तो खाली पडला.
याबाबतची माहिती लोकलमधील प्रवाशांनी तातडीने डोंबिवली जीआरपीला दिली, मात्र पोलीस जागेवर पोहोचेपर्यंत रजनीशचा मृत्यू झाला. रजनीश हा विवाहित असून त्याला दोन लहान मुलं असल्याची माहिती आहे.
या घटनेने रजनीशच्या परिवारावर मोठं संकट कोसळलं आहे. दरम्यान, डोंबिवलीत यापूर्वी भावेश नकाते आणि धनश्री गोडवे या दोघांचा अशाच प्रकारे गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला होता.