ISIS संबंधांवरुन अटकेत असलेले 9 जण रासायनिक हल्ला करणार होते?
एबीपी माझा वेब टीम | 24 Jan 2019 09:06 AM (IST)
उम्मत-ए-मोहम्मदिया या नावाने यांनी संघटना सुरु केली होती. आरोपींपैकी दोन आरोपी हे अभियंते आहेत तर एक आरोपी फार्मासिस्ट आहे.
मुंबई : आयसिसशी संबंधावरुन अटक करण्यात आलेले नऊ तरुण रासायनिक हल्ल्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींकडून एटीएसने हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि इतर रसायने जप्त केली आहेत. ही रसायने पाण्यात किंवा खाद्यपदार्थांत मिसळून हे सगळे हल्ल्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. आरोपींमधला एक अल्पवयीन आहे तर एक आरोपी अंडरवर्ड डॉन राशिद मलबारीचा मुलगा आहे. एटीएसला वेळीच याची खबर लागली आणि एक मोठा अनर्थ टळला. उम्मत-ए-मोहम्मदिया या नावाने यांनी संघटना सुरु केली होती. आरोपींपैकी दोन आरोपी हे अभियंते आहेत तर एक आरोपी फार्मासिस्ट आहे. जम्मन नबी नावाचा हा फार्मासिस्ट ठाणे महापालिकेत कामाला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सलमान सिराजुद्दीन खान हा टोळीचा म्होरक्या असून त्याच्याकडून ग्लिसरीन 4 ग्रॅम, 5 ग्रॅम युरियाचे दोन पॅकेट, 5 ग्रॅम केमिकल पावडर जप्त करण्यात आलं आहे. तर इतरांकडून 6 सुऱ्या, 6 पेन ड्राईव्ह, मोबाईल 24, लॅपटॉप ६, वायफाय राऊटर 6, हार्ड ड्राईव्ह 6, मेमरी कार्ड 6, अनेक ग्राफिक कार्ड, रॅम, डोंगल, मॉडेम जप्त करण्यात आली आहेत. यातील आठ आरोपींना बुधवारी कोर्टत हजर केले असता त्यांना पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.