विरार : विरारमधील हत्याकांड उघडकीस आल्यानंतर अवघ्या 24 तासात उलगडा झाला. एक लाख रुपयांच्या देवाणघेवाणीतून 58 वर्षीय गणेश कोटलकरांची निर्घृण हत्या झाली. तीन दिवस एका बंद रुममध्ये आरोपी मृतदेहाचे लहान-लहान तुकडे करत होता. या हत्येचा उलगडा झाला तो एका 'एक्सो ब्लेड'मुळे! विरार पश्चिममधील ग्लोबल सिटीतील बचराज पॅराडाईज या इमारतीच्या सी विंग मधील 602 क्रमांकाच्या रुममध्ये ही हत्या झाली.


58 वर्षाचे गणेश कोटलकर हे मीरारोडमध्ये राहत होते. त्यांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता. अविवाहित असलेल्या गणेश यांनी वयाच्या 58 व्या वर्षी लग्न करण्याची तयारी सुरु केली होती. तर 45 वर्षीय आरोपी पिंटू शर्मा हा मुंबईतील वाकोला भागातील रहिवासी आहे. त्याचा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय आहे.

गणेश आणि पिंटू यांची गेल्या वर्षभरापासून मैत्री होती. आरोपी पिंटूकडून गणेश यांनी एक लाख रुपये उधारीवर घेतले होते. त्यापैकी 40 हजार रुपये त्यांनी परत दिले, तर 60 हजार देण्यास ते टाळाटाळ करत होते. यातून दोघांचे वादही झाले होते.

गणेश पैसेच देत नसल्याने त्यांचा काटा काढायचा प्लॅनच पिंटूने रचला. ज्या रुममध्ये गणेश यांची हत्या करण्यात आली, ती रुम एक जानेवारी रोजी पिंटूने भाड्याने घेतली होती. 20 जानेवारीला आपण राहायला येणार असल्याचं त्याने सोसायटीला सांगितलं होतं.

त्याआधीच प्लॅन करुन पिंटूने 16 जानेवारीला गणेश कोटलकर यांना विरारमधील रुम दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून घेतलं. गणेश यांनी आपण लग्न करणार असल्याचं पिंटूला सांगितलं. त्यावर आरोपीने गणेश यांना अश्लील भाषेत उत्तर दिलं. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुकी झाली. गणेश जाडजूड असल्याने खाली पडले. हीच संधी साधून आरोपीने त्यांच्यावर वार करुन रुममध्येच हत्या केली. आरोपीने असा कबुली जबाब पोलिसांना दिला.

हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न आरोपी पिंटूसमोर होता. त्यासाठी त्याने चक्क गणेश यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले. अक्षरशः हाडापासून मांस वेगळं केलं आणि मांसाचे बारीक बारीक तुकडे करुन ते रुममधील टॉयलेटच्या टॅंकमध्ये टाकले आणि हाडं पिशवीत भरुन रेल्वेतून जाताना वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिली.

पिंटू तीन दिवस त्या बंद खोलीत एक्सो ब्लेडने गणेश यांच्या मृतदेहाचे तुकडे करत होता. रुम स्वच्छ धुवून त्या ठिकाणी काही झालंच नाही, अशा आविर्भावात तो घटनास्थळावरुन पसार झाला होता. मात्र मृतदेहाचं मांस टॉयलटच्या टॅंकमधून पाईपवाटे चेंबरमध्ये येताना अडकलं होतं. त्यामुळे चेंबर चोकअप झाला.

शुक्रवारपासून इमारतीच्या परिसरात पूर्णपणे दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे शनिवारी सोसायटीने चेंबर साफसफाई केली. त्यात मांसाचे जवळपास 35 ते 40 किलोचे तुकडे बाहेर निघाले. सुरुवातीला सफाई कर्मचाऱ्यांनी सर्व तुकडे सोसायटीपासून काही अंतरावर असलेल्या गटारात फेकून दिले. पण त्यातच माणसाचा अंगठा आणि 3 बोटं सापडल्याने एकच खळबळ उडाली. बोटात एक रिंग सापडल्याने हा मृतदेह महिलेचा असल्याचा संशय आला होता. सर्व मांसाचे तुकडे जमा करुन फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवण्यास सुरवात केली.

सोसायटीचे सीसीटीव्ही आणि सर्व बंद रुम तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली. बंद रुमच्या मालकांची चौकशीही करण्यात आली. सी विंग मधील 602 रुम तपासताना पोलिसांना त्याठिकाणी एक एक्सो ब्लेड मिळाला. मात्र संपूर्ण रुम चकाचक असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यावरुन या रुमच्या भाडोत्रीची चौकशी करण्यास सुरुवात झाली. रुम एजंटमार्फत पिंटूला बोलावून घेतलं आणि पोलिसांनी त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष केंद्रित केलं. चौकशी सुरु करताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करुन अवघ्या चौवीस तासात हत्येचा उलगडा केला.

सध्या पोलीस फॉरेन्सिक लॅबच्या टीमसह रुमची पडताळणी करत आहेत. शरीराचे इतर अवयव कुठे कुठे टाकले आहेत, याचीही चौकशी पोलिस करत आहेत.