मुंबई: भाजप आमदार अनिल गोटे यांच्या विधानपरिषद बरखास्तीच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘गोटेंचं वक्तव्य हे सभागृहाच्या उंचीला शोभणारं नाही’. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गोटेंना सुनावलं.
काल अनिल गोटेंनी विधानपरिषद बरखास्तीची मागणी केल्यानंतर सर्व पक्षातून टीकेची झोड उठली. त्यानंतर या मुद्यावर आज मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी गोटेंचं वक्तव्य सरकारला आणि वैयक्तिक आपल्यालाही आवडलं नसल्याचं सांगितलं.
‘संविधानाने हे सभागृह तयार झालं आहे, कोणाच्या सांगण्यावरून ते तयार झालेलं नाही.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसंच विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असल्यानं या सभागृहाबद्दल कुठलीही द्विधा मन:स्थिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.