मुंबई : चिपळूणमध्ये राहणाऱ्या सात महिन्यांच्या चिमुरडीने खेळताना एलईडी बल्ब गिळला होता. सुदैवाने हा बल्ब बाहेर काढण्यात यश आलं असून अरिबाची प्रकृती स्थिर आहे.


चिपळूणमध्ये राहणाऱ्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला होता. तिने दोरा किंवा पिन गिळली असावी, असं पालकांना वाटलं. त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागल्यामुळे पालकांनी तिला चिपळूणमधील डॉक्टरांकडे नेलं.

परिस्थितीत काहीही बदल झाला नाही, तेव्हा तिचा एक्स-रे काढला. त्यावेळी तिच्या उजव्या फुफ्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचं समजलं. त्यानंतर अरिबाला 'बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालय'मध्ये दाखल केलं.

डॉक्टरांनी कुठलाही वेळ न दवडता तपासणी करुन ब्लॉन्कोस्कोपीने अगदी दोन मिनिटांत हा बल्ब बाहेर काढला. हा बल्ब 2 सेमीचा होता.



सध्या अरिबाची प्रकृती स्थिर असून तिला दोन दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून अरिबाच्या वडिलांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.