मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी आज शिवतीर्थावर येणार आहेत.


बाळासाहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी शिवाजीपार्कवर बाळासाहेब ठाकरेंचं वाळू शिल्प म्हणजेच सॅण्ड आर्ट तयार केलं आहे. शिवसैनिक असलेले लक्ष्मी कांबळे यांनी हे शिल्प साकारलं आहे.



दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जमा केलेले दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहेत.

विशेष बसची सोय
स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क स्मृतीस्थळापर्यंत आज विशेष बसची सोय करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या सोयीसाठी दादर स्टेशन (पश्चिम), कबुतरखाना, वीर कोतवाल उद्यान (प्लाझा), राम गणेश गडकरी चौक, गोखले मार्ग (उत्तर), रानडे रोड, शिवाजी पार्क या मार्गावरुन आज सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत या विशेष बस धावतील.

मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे एकत्र
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त एकत्र येणार आहेत. दोघांच्या उपस्थितीत आज महापौर निवासात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक वेबसाईटचं लोकार्पण करण्यात येणार आहे.