मुंबई : तिवरांची कत्तल थांबवा, अन्यथा मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं वाळवंट होईल, अशी भीती मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली आहे.


आज ज्या गतीने तिवरांची होत असलेली कत्तल, अशीच सुरु राहिली तर तर या महानगरांत लोकवस्तीच उरणार नाही, मग आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार?, असा सवाल मुंबई हायकोर्टाने विचारला आहे.

दुबई आणि अन्य आखाती देशांत लोकं वाळवंटात उद्यान बनवतायत, आपण मात्र त्याच्या उलट जातोय, असेही मुंबई हायकोर्टाने नमूद केले.

“आज मुंबईत आणि आसपासच्या परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती वाढतेय, लोकं जीम, स्विमिंग पूल अशा अद्ययावत सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या आलिशान टॉवरमध्ये राहायला जातायत. पण पर्यावरणाचा समतोल साधला नाही तर निसर्गासमोर एकदिवस सर्व मातीमोल होईल”, अशीही भीती मुख्य न्यायमूर्तींनी बोलून दाखवली.

नवी मुंबई आणि ठाण्याच्या परिसरात बेसुमार तिवरांच्या झाडांची कत्तल झाली आहे. याविरोधात हायकोर्टात विविध याचिका प्रलंबित आहेत. बॉम्बे एन्व्हयरमेंट अैक्शन ग्रुपच्या वतीने दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं प्रशासनाला यासंदर्भात गांभीर्यानं विचार करण्याची सूचना देत सुनावणी तहकूब केली.