भिवंडी : भिवंडीमधील कामतघर येथे एका 52 वर्षीय विवाहित महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या हत्येनंतर तिचा पती घरातून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे महिलेची हत्या तिच्या पतीनेच केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मालती विनोद झा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.


आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मालती यांची गळा चिरुन हत्या झाल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांना तात्काळ पाचारण करण्यात आलं. दरम्यान, तेव्हापासून मालती यांचा पती विनोद झा हा बेपत्ता झाला आहे.

मालती यांच्या हत्येनंतर घरातील सर्व मौल्यवान चीजवस्तू जागेवरच असल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली नसल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं आहे. त्यामुळे ही हत्या नेमकी कुणी आणि का केली? हे शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, पोलीस या हत्येनंतर मालती यांचा पती विनोद झा याचा कसून शोध घेत आहेत.