ठाणे : फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि पार्ट्यांच्या माध्यमातून झालेली अवघी सहा महिन्यांची मैत्री ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या अंगाशी आली आहे. या मुलींचे अपहरण करून त्यांचा विनयभंग झाल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये या मुलींपैकी एकीच्या पालकांनी दाखल केली आहे. त्यानुसार तीन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे.
घटना काय आहे?
17 तारखेला या तीन मुली आणि त्यांचे तीन मित्र घोडबंदर येथील ओवळा येथे पार्टी करण्यासाठी गेले होते. या आरोपींपैकी एका मुलाच्या घरी ही पार्टी करण्याचे ठरले होते. संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान हे सहा जण त्याठिकाणी पोहोचले. त्यानंतर मद्यसेवन करून नाच-गाण्यांचा कार्यक्रम झाला. तोपर्यंत रात्र झाल्याने त्या तिघी त्याच ठिकाणी राहिल्या. याच संधीचा फायदा घेत या तिन्ही मुलांनी त्या मुलींचा विनयभंग केला.
इकडे या मुलींच्या कुटुंबीयांनी मुलींचा शोध सुरु केला. पोलीस देखील या शोधकार्यात सहभागी झाले. पोलिसांनी मोबाईल नेटवर्कच्या साहाय्याने मुलींचे लोकेशन शोधले. पण तोपर्यंत सकाळी 6.30 पर्यंत एक मुलगी घरी आली. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला.
या प्रकरणात तिन्ही आरोपींना अटक केली असून, त्यातील एक अल्पवयीन आहे. या आरोपींवर अपहरण करणे, विनयभंग करणे आणि अल्पवयीन मुलावर पॉस्कोच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.
तिन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या सर्व प्रकारातून मोबाईलचा अतिरेक आणि पालकांचे पाल्यांकडे नसलेले लक्ष पुन्हा अधोरेखित झाले आहे.
सोशल मीडियावरील मैत्री अंगाशी, ठाण्यात तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2017 08:53 PM (IST)
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि पार्ट्यांच्या माध्यमातून झालेली अवघी सहा महिन्यांची मैत्री ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या अंगाशी आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -