भिवंडी (ठाणे) : खदानीच्या डबक्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायत हद्दीतील दहेलेपाडा या आदिवासी वस्तीत ही घटना घडली.
भिवंडीतील कांबे ग्रामपंचायत हद्दीतील दहेलेपाडा येथे आदिवासी चैत्या फकाट हे कुटुंबीयांसोबत राहत असून, त्यांची विधवा मुलगी शारदा आपल्या दोन मुलींसह त्यांच्याच घरात राहत होती. रोहिता रवी मांगत (वय 13 वर्षे), रसिका रवी मांगत (वय 12 वर्षे) असे शारदाच्या मुलींची नावं होती.
घरातील मंडळी मोलमजुरीसाठी भिवंडी शहरात गेले होते. त्यावेळी चैत्या फकाट यांची लहान मुलगी नीता आपल्यान दोन भाचींसोबत म्हणजे रोहिता आणि रसिकासोबत पोहण्यासाठी शेतातल्या खदानमधील डबक्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात अंघोळीसाठी गेल्या होत्या.
नीता खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याने रोहिता आणि रसिका या बहिणी आपल्या मावशीला वाचविण्याचा प्रयत्न करायला गेल्या. त्यावेळी त्यासुद्धा पाण्यात बुडू लागल्या. काठावरील लहान मुलांनी नीताच्या घरी जाऊन तिची आई सुकरीबाई हिला मुली बुडत असल्याची माहिती दिली असता, त्यांनी डबक्याजवळ येऊन मुलींना वाचवण्यासाठी लोकांना आरडाओरड करुन बोलावले. परंतु दुपारची वेळ असल्याने बहुसंख्य पुरुष मंडळी घराबाहेर असल्याने त्यांना वाचविण्यात अपयश आले.
त्यानंतर उशिराने आलेल्या पुरुष मंडळींनी या तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. रात्री उशिरा नऊ वाजता या घटनेची माहिती स्थानिक निजामपुरा पोलीस स्टेशन येथे न देताच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस यंत्रणेला कळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी कुटुंबियांचे जाबजबाब नोंदविले असून घटनास्थळ आणि अंत्यसंस्कार स्थळाला भेट दिली.