मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज (रविवार) 19 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हरहेड वायर, रुळ आणि इतर तांत्रिक बाबींची देखभाल आणि दुरुस्ती यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करू इच्छिणाऱ्यांचा पुन्हा एकदा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे

कल्याण ते ठाणे दरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात धिम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर मुलुंडनंतर या लोकल पुन्हा धिम्या मार्गावर धावतील.

पश्चिम रेल्वे

पश्चिम मार्गावर अंधेरी ते बोरिवली दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येतोय. दुपारी 4.20 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात बोरीवली ते अंधेरी दरम्यानच्या जलद फेऱ्या धिम्या मार्गावरुन वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात कुर्ला ते वाशी ही सेवा पूर्णपणे बंद असेल. पण सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतील.