मुंबई : राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसाचा (Rain) धुमाकूळ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, आज वादळी वाऱ्यासह राजधानी मुंबई (Mumbai) पावसाच्या तडाख्यात सापडली असून विविध ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. शहरातील घाटकोपर, वडाळा, भायखळा परिसरात अपघाताच्या (Accident) घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, घाटकोपर येथील पेट्रोल पंपाववर महाकाय होर्डींग कोसळल्याने तब्बल 70 ते 80 चारचाकी गाड्या या बॅनरखाली अडकल्या आहेत. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे. तर, आत्तापर्यत 59 जणांना बाहेर काढण्यात आलं असून ते जखमी आहेत. या बॅनरखाली 100 जण अडकले होते, अद्यापही मदत व बचावकार्य सुरू आहे. 


घाटकोपर महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 जणांचा मत्यू झाला असून 57 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. या घटनेची पालिका प्रशासन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी 20 पेक्षा अधिक रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (NDRF) यांना देखील पाचारण करण्यात आले असून पुढील बचावकार्य सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. 






दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी धाव घेतली आहे.