MBA झालेल्या तरुणाची आत्महत्या, जुहूच्या समुद्रात उडी!
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2018 04:41 PM (IST)
नोकरीतील निराशा आणि एकटेपणातून मानसिक तणावाखाली येऊन अजितने टोकाचं पाऊल उचललं.
मुंबई : एमबीए झालेल्या तरुणाने जुहूच्या समुद्रात आत्महत्या केली. अजित दत्तात्रय डुकरे असे या तरुणाचे नाव असून, तो 29 वर्षांचा होता. उच्चशिक्षण घेतलेल्या अजितने एमबीएचं शिक्षण पूर्ण केले होते. मात्र नोकरीतील निराशा आणि एकटेपणातून मानसिक तणावाखाली येऊन अजितने टोकाचं पाऊल उचललं. अजित डुकरे हा घाटकोपरमधील इंदिरा नगरमध्ये राहत होता. अजितने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यात त्याने एकटेपणा आणि निराशेत असल्याचे नमूद केले आहे. अजित हरवल्याची तक्रार गुरुवारी घाटकोपर पोलिस ठाण्यात त्याच्य कुटुंबीयांनी नोंदवली होती. अजितचा मृतदेह जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर सापडला. कूपर रुग्णालयात अजितच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करुन, त्याच्या कुटुंबीयांनी अंतिम क्रियेसाठी जुन्नर तालुक्यातील औरंगपूरला नेले. दहवीपासूनच अत्यंत हुशार असलेल्या अजितने नैराश्येतून टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.