मुंबई : जास्तीत जास्त मराठा तरुण प्रशासकीय सेवेत यावेत, यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मान विकास संस्थेच्या (सारथी) वतीने केंद्रीय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मराठा समाजातील 225 तरुणांना दिल्लीतील खासगी शिकवणी वर्गात पाठविण्यात येणार आहे. या तरुणांच्या प्रशिक्षण शुल्कासह शिकवणी काळात दरमहा 13 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. याशिवाय सेट, नेट परीक्षा तसेच न्यायाधीश पदाच्या पूर्व तयारीसाठी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली.


मराठा समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी केंद्रीय प्रशासकीय सेवेत यावेत, यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी दिल्लीतील यूपीएससी परीक्षांचे क्लासेस घेणाऱ्या संस्थांमध्ये या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी सारथी संस्थेच्या वतीने योजना तयार केली आहे. यामध्ये 225 तरुणांना या क्लाससाठी पाठविण्यात येणार असून त्यांचे शुल्क सारथीच्या वतीने भरण्यात येणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.


तसेच या विद्यार्थ्यांना 13 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच दिल्लीत प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या महिन्यासाठी 15 हजार रुपये या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. याबरोबरच प्राध्यापक व सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या सेट व नेट परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असून राज्यातील 1500 तरुणांना याचा फायदा होणार आहे. तसेच न्यायाधीश पदाच्या भरती परीक्षेसाठीही मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.


तसेच, मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील खटलेही लवकरच मागे घेण्याची प्रक्रिया अतिशय गतीने सुरु असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.