मुंबई : चित्रकला म्हटलं की, कॅनव्हास, ब्रश, कलर या गोष्टी नजरेसमोर येतात. मात्र इस्त्री, मेण आणि धारदार अवजारांनी केली जाणारी चित्रकला फारच कमी जाणांना ठाऊक असेल. या कलेला 'एन्कॉस्टिक' या नावानं ओळखलं जातं. पुण्यातील 91 वर्षीय कलाकार गंगाधर ताटके यांनी ही कला आजही जपली आहे. त्यांच्या या अनोख्या कलेचं सध्या मुंबईतील जहांगिर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरलंय. येत्या एक मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे.


साधरणपणे दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीक साम्राज्याच्या काळात या कलेचा उदय झाला. त्याकाळात जहाजांवर अश्याप्रकारची चित्र काढली जायची. मात्र कालांतरानं ही कला लुप्त झाली. जगभरात आज काही मोजक्याच व्यक्तींना ही कला आत्मसात आहे. गंगाधर ताटके हे मुळचे पुण्याचे, साल 1952 मध्ये त्यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधनं पद्वी घेतली. त्यानंतर त्यांनी स्क्रीन पेंटिंग आणि इलिस्ट्रेशनमध्ये बरीच वर्ष काम केलं.

या कलेला कागदावर उतरवताना ताटके विविध प्रकारच्या विशिष्ठ मेणांचा वापर करताता. प्रवासात वापरण्यात येणाऱ्या छोट्या इस्त्रीवर क्ले कलर गरम करून ते कागदावर घेतले जातात. त्यानंतर इस्त्रीसह इतर अवजारांचा कल्पकतेनं वापर करून कागदावर स्ट्रोक्स खेचले जातात. हे मेण चटकन सुकत असल्यानं यात सुधारणेला फारस थोडा वाव असतो. अपवाद फक्त क्रीम व्हॅक्सचा, ज्यात ऑईल पेंट मिक्स करून रंग तयार करावा लागतो. त्यानंतर कागदावरील कलर सुकवायला हेअर ड्रायरचा वापर करावा लागतो. या कलेत कलाकार त्याच्या कल्पकतेनं अनेक गोष्टींचा वापर करू शकतो.

आज वयाची नव्वदी पूर्ण करूनही गंगाधर ताटकेंची ऐकण्याची क्षमता, खणखणीत आवाजाचं कौतुक वाटतं. आपली कला सादर करताना त्यांचा उत्साह, लोकांना ही कला समजावून सांगतानाची त्यांची तळमळ आजही कायम आहे. त्यांनी साकारलेल्या प्रदर्शनातील चित्रांत निसर्गचित्र, व्यक्तीचित्र यांसाह अॅब्स्ट्रॅक्ट चित्रांचा भरणा आहे. आपल्या या कलेचा प्रसार करण्यासाठी 'एन्कॉस्टिक मीडियम अँड टेक्निक्स' हे पुस्तक देखील विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे.