पनवेल : पनवेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घरफोड्या करणाऱ्या एका दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात पनवेल पोलिसांना अखेर यश आलं आहे. या चोरानं आतापर्यंत तब्बल 18 ते 20 घरफोड्या केल्या आहेत. त्याला उत्तरप्रदेशमधील आझमगढमधून अटक करण्यात आली. श्रावण राजभर असं या चोराचं नाव आहे.
विशेष म्हणजे हा चोर फक्त सोनं चोरी करायचा. याशिवाय तो चांदीचे दागिने किंवा घरातील दुसऱ्या कोणत्याही किंमती वस्तूला हात लावत नव्हता. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 21 लाखाचे दागिने हस्तगत केले आहेत.
गेल्या काही दिवसात पनवेल आणि नवी मुंबईमध्ये घरफोड्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. घरफोड्या करणाऱ्या काही टोळ्यांना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं. पण पनवेल परिसरातील घरफोड्यांचे सत्र सुरुच होते. याचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून एकच व्यक्ती घरफोड्या करत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत आरोपी श्रावण राजभर याला उत्तरप्रदेशमधून अटक केली. त्यावेळी आपण १८ ते २० घरफोड्या केल्याचं त्यानं कबूल  केलं.
आरोपी श्रावण राजभर हा घरफोड्या करण्यासाठी ग्रामीण भागातील घर हेरायचा. यावेळी तो फक्त घरातील सोन्याचे दागिनेच चोरायचा. चोरलेले दागिने तो खांदेश्वर ब्रिजखाली , खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळी आणि कामोठेतील काही ठराविक ठिकाणी जमिनीमध्ये पुरुन ठेवायचा. अखेर त्याला अटक केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.