मुंबई :  मुंबईतील 1993 च्या साखळी स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री त्याला छातीत दुखत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आज त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.


मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावणारा दोषी आरोपी मुस्तफा डोसाला काल रात्री अचानक छातीत दुखू लागलं होतं. त्यामुळे काल रात्री 1 वाजता त्याला मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

रुग्णालयात त्याच्यावर तीन तास उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलं.

अनियंत्रित अतितणाव आणि छातीतील संसर्गामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण आज त्याचा मृत्यू झाला.

मुस्तफा डोसासारख्या खतरनाक गुंडाची तब्येत बिघडल्यामुळे काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. जेल अधीक्षकांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच जे. जे. रुग्णालयात हजेरी लावली.

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी मुस्तफा डोसाला विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी डोसाला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. न्यायालय दोषींना काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह शेख यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला.

कोण होता मुस्तफा डोसा?

  • मुस्तफा डोसा हा 1993 च्या साखळी स्फोटातील महत्त्वाचा आरोपी.

  • दाऊद आणि टायगर मेमन यांना स्फोट घडवण्यासाठी मदत

  • मुंबई स्फोट घडवण्यासाठी ज्या बैठका झाल्या, त्या डोसानेच आयोजित केल्या होत्या.

  • डोसाने शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी भारतातून काही जणांना पाकिस्तानात पाठवलं होतं.

  • डोसानेच एके-47,एके-56 रायफल्स आणि स्फोटकांचा पहिला साठा रायगड जवळच्या दिघीबंदरात पाठवला होता.

  • डोसाला सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याने 1995 साली दिलेल्या जबाबावरून या स्फोटाचा आरोपी बनवण्यात आलं.

  • त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 20 मार्च 2003 साली अटक करण्यात आली होती.


संबंधित बातम्या

मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटप्रकरणी 6 दोषी, 1 निर्दोष

रमजाननिमित्त मुस्तफा डोसाला हवेत नवे कपडे आणि मिठाई

अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी? 29 मे रोजी निकाल


अबू सालेम असलेल्या तळोजा जेलमध्ये कैदी-पोलिसांची मैफील


कबूल है, मी निकाहसाठी तयार; डॉन अबू सालेम पुन्हा बोहल्यावर चढणार