उल्हासनगर : उल्हासनगरमधील वदोळ गावातला चिमुकला वालधुनी नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. गणेश जैसवार असं मृत मुलाचं नाव असून तो सहा वर्षांचा होता.
वादोळ गावातून उल्हासनगर कॅम्प 3 कडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये वालधुनी नदीचा मोठा प्रवाह आहे. या नदीवर लोखंडी पूल होता. हा पूल कोसळल्यानंतर तिथे सिमेंटचा पूल उभारण्याचं काम महापालिकेने ठेकेदारांना दिल. मात्र हे काम मनमानी पद्धतीने सुरु असल्याचा अहवाल दिल्यानंतर ते काम थांबवलं. ठेकेदाराने मनपाच्या मदतीने तात्पुरता रस्ता म्हणून फळ्या टाकल्या होत्या. दोन दिवसांच्या पावसामुळे नदीचं पाणी वाढल्याने फळ्या वाहून गेल्या. त्यामुळे लोक दगडावरुन ये-जा करत होते.
मंगळवारी संध्याकाळी गणेश जैसवार हा मुलगा दगडावरुन जात होता. पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत पडला आणि वाहून गेला. अग्निशमन दलाने शोध घेतल्यानंतर आज सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.