डोंबिवली : जैन धर्मियांमध्ये लहान मुलांनी दिक्षा घेत साधू, मुनी झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं. मात्र, डोंबिवलीतील एक १९ वर्षीय मराठी तरुण जैन धर्माची दिक्षा घेणार असल्याचं समोर आलं आहे. मंदार म्हात्रे असं या तरुणाचं नाव असून, तो आयुष्यभर जैन मुनी म्हणून धर्मप्रचारकाचं काम करणार आहे.
२७ एप्रिलला डोंबिवलीत हा सोहळा पार पडणार आहे. म्हात्रे कुटुंबाचा शेजारी गुजराती जैन कुटुंब राहतं. लहानपणापासून मंदार या कुटुंबीयांसोबत जैन मंदिरात जात होता. तिथं एका बालमुनीशी त्याची भेट झाली आणि आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याचं मंदारचं म्हणणं आहे. महत्वाची बाब म्हणजे एकुलत्या एक मुलाच्या या निर्णयानंतर आपण समाधानी असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं.
मंदार आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, सगळं लहानपण मराठमोळ्या डोंबिवलीत गेलेलं. पण हे सगळं मागे ठेऊन तो येत्या २७ एप्रिलला जैन धर्माची दीक्षा घेणार आहे. यानंतर आयुष्यभर तो जैन मुनी म्हणून जैन धर्माचा प्रचार करणार आहे.
जैन धर्माची दीक्षा घेतल्यानंतर मंदारचं आयुष्य पुरतं बदलून जाणार आहे. अंगात पांढरे कपडे, जैन मंदिरात वास्तव्य, अनवाणी फिरणं. सुखवस्तू आयुष्याचा त्याग करणं, दोन वेळा जेवणं तर दूर, पण अगदी पंख्याची हवा किंवा फ्रिजचं पाणीही न पिणं असे जैन मुनींच्या आयुष्यात असलेले निर्बंध मंदारला पाळावे लागणार आहेत. महत्त्वाची बाब दीक्षा घेतल्यावर त्याचं नाव बदलून त्याला नवीन ओळख मिळणार आहे. त्यानंतर तो आयुष्यभर कधीही त्याच्या घरीही जाऊ शकणार नाही. अगदी सुखाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगीसुद्धा...