मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून 19 किलो सोन्याची बिस्कीटं जप्त केली आहेत. विशेष म्हणजे आखाती देशातून आलेल्या या प्रवाशाने एका वॉशिंग मशीनमध्ये सोनं लपवून आणलं होतं, मात्र ते कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेतून वाचलं नाही.

 
मशीनच्या काही पार्ट्समध्ये सोनं लपवण्यात आलं होतं. मशीन पूर्णपणे उघडून त्यातून सोन्याची 19 बिस्किटं जप्त करण्यात आली. या प्रत्येक बिस्किटाचं वजन 2204 ग्रॅम होतं. या सोन्याची किंमत जवळपास 60 लाख 15 हजार रुपये आहे.

 
मुंबई विमानतळावर रात्री उशिरा मोहम्मद अस्लम शेख हा भारतीय प्रवासी आला. रियाधहून तो जेट एयरवेजच्या विमानाने मुंबईला आला होता. कस्टम अधिकाऱ्यांना त्याच्या सामानाची तपासणी करताना त्यात वॉशिंग मशीन पाहून थोडं आश्चर्य वाटलं, तसंच संशयही आला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मशिन उघडून पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

 
सर्वाधिक सोनं मशीनच्या मोटरमध्ये लपवून ठेवण्यात आलं होतं. कस्टमने सगळं सोनं जप्त केलं असून आरोपीची अधिक चौकशी सुरु आहे.