नालासोपारा (ठाणे) : नालासोपाऱ्यात 14 वर्षाच्या मुलाने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भावाचं लक्ष गेल्याने त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याची प्रकृती चितांजनक आहे. त्रिमूर्ती यादव असं या मुलाचं नाव असून, त्याच्या कुटुंबाने रॅगिंगची तक्रार शाळा प्रशासनाकडे केल्याच समोर आलं. मात्र, शाळेने अद्याप तक्रार गांभिर्याने केली नाही.


नालासोपारा पूर्वेकडील संतोषभुवन परिसरात राहणारा त्रिमूर्ती यादव विद्या वारिधी विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत आहे. यापूर्वी तो मुंबईच्या फिल्मसिटी जवळ राहयचा. याच वर्षी जून महिन्यापासून नालासोपाऱ्याला राहायला आल्याने त्याने विद्या वारिधी विद्यालयात प्रवेश घेतला.

नवीन प्रवेशामुळे येथील शाळेतील काही मुलांनी त्याला रॅगिंग करण्यास सुरूवात केली. शाळेत गेल्यानंतर जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल हिसकावणे, मारहाण करणे असं ञिमुर्तीचा छळ ही मुलं करत होती.

त्रिमूर्तीने याबाबत पालकांना सांगितलं. पालकांनीही शाळा प्रशासनाला ही गोष्ट सांगितली,. मात्र शाळेनं म्हणावी तशी ही बाब गंभीरतेने घेतली नाही. काल सोमवारीच त्रिमुर्तीचे पालक शाळेतील शिक्षकांना पुन्हा भेटले आणि कैफीयत मांडली. मात्र त्यातून त्रिमूर्तीला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातूनच घरी गेल्यावर त्रिमूर्तीने घरातच नायलॉनच्या रस्सीने आपलं जीवन संपवण्याच टोकाचं पाऊल उचललं.

त्रिमूर्तीच्या भावाने लवकर बघितल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. शाळा प्रशासनाने काल त्रिमूर्तीचे पालक आल्याचं मान्य केलं. मुलांना समजावलं असल्याचं सांगितलं. यावर दोषीवर कारवाईचे संकेत ही शाळेने दिले आहेत.

सध्या तुळींज पोलिसांनं त्रिमूर्तीच्या घरच्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. मात्र त्रिमूर्तीच्या जबानीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल. तोपर्यंत त्रिमूर्तीची प्रकृती सुधारण्याची वाट पोलीस बघत आहेत.