नॅशनल पार्कमधील 13 वर्षीय वाघ पलाशचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2016 11:01 PM (IST)
मुंबई: बोरीवलीतल्या नॅशनल पार्कचा हिरो असलेल्या पलाश या 13 वर्षीय पट्टेरी वाघाचा दीर्घ आजारानं मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या पलाशनं खाणंपिणं सोडून दिलं होतं. आठवड्याभरापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर पहाटे सव्वा तीन वाजता त्याचा मृत्यू झाला. 9 वर्षांपूर्वी भोपाळच्या वनविहार राष्ट्रीय पार्कातून पलाशला नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलं. त्यावेळी तो फक्त 3 वर्षांचा होता. काही वर्ष पिंजऱ्यात काढल्यानंतर त्याला जंगल सफारीसाठी मोकळं सोडण्यात आलं होतं. पलाश हा भारतातला वयानं मोठा असलेला दुसरा वाघ होता. त्याच्यापेक्षा मोठा असलेला 17 वर्षीय बाजीरावही नॅशनल पार्कमध्ये आहे. नॅशनल पार्कच्या जंगल सफारीचं पलाश हा एक मुख्य आकर्षण होता. बिग बी अमिताभ बच्चनही त्याच्या प्रेमात पडले होते. व्याघ्र बचाव मोहीमेचे ब्रँड अॅम्बेसेडेर असलेले अमिताभ बच्चन जेव्हा नॅशनल पार्कात गेले होते तेव्हा पलाशनं त्यांच्या गाडीचा पाठलाग केला होता.