उल्हासनगर : बारावीच्या परीक्षेचं परीक्षा केंद्र पाहून परतत असताना एका विद्यार्थ्याचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिरूद्ध असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. परीक्षा केंद्र पाहून मित्राकडे नोट्स घेण्यासाठी लोकलने बदलापूरला जात असताना धावत्या लोकलमधून खाली पडून उल्हासनगरात त्याचा मृत्यू झाला.
अनिरूध हा सीएचएम कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वाणिज्य शाखेत शिकत होता. बारावीच्या परीक्षेसाठी त्याचं हॉलीफॅमिली शाळेत परीक्षा केंद्र आलं होतं. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास परीक्षा केंद्र पाहण्यासाठी जात असल्याचं सांगून तो घरातून निघाला. रात्री 9 वाजले तरी तो घरी परत न आल्याने त्याच्या वडिलांनी मोबाईलने त्याला संपर्क केला. यावेळी अनिरुद्धने फोन उचलला, मात्र त्याला बोलता येत नव्हतं.
त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलीस ठाण्यात आणि रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधल्यानंतर अंबरनाथ ते बदलापूरच्या रेल्वे मार्गादरम्यान अप मार्गावर एक तरूण धावत्या लोकलमधून पडल्याचं समजलं. अनिरूद्धच्या घरच्यांनी आणि पोलिसांनी त्याचा रेल्वे मार्गावर शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.