मुख्यमंत्री दिल्ली दरबारी, शिवसेनेसोबतच्या कोंडीवर चर्चा?
एबीपी माझा वेब टीम | 28 Feb 2017 08:46 AM (IST)
नवी दिल्ली : भाजपच्या मदतीशिवाय अन्य कुणाचंही सहकार्य घेऊन मुंबई महापालिकेचं महापौरपद मिळवायचं, असा निर्धार शिवसेनेनं केल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील कोंडी कायम आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती आहे. पर्यावरण विभागाच्या बैठकांच्या निमित्ताने मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. बैठकीनंतर ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निकालांबाबत मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांशी बोलणं झालं आहे. मात्र पुढील रणनीतीबाबत शाहांशी मुख्यमंत्र्यांची नियमित चर्चा सुरु आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीबाबतही मंगळवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेनेत संघर्ष रंगला आहे. महापौर आपलाच असेल, असा दावा शिवसेनेने केला आहे, तर भाजपनेही आपला महापौर बसेल, असा दावा केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 82, तर शिवसेनेने 84 जागा मिळवल्या आहेत. पण शिवसेनेने 4 अपक्षांची मदत घेण्यास यश मिळवल्याने शिवसेनेचा आकडा आता 88 झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्या :