मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ आपल्याला यावर्षी सुद्धा पाहायला मिळतोय. अकरावी ऑनलाईन प्रवेशाची तिसरी यादी जाहीर होऊनही अद्याप 50 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत.
एवढंच नाही, तर अल्पसंख्यांक कॉलेजबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे 80 ते 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवूनही आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवा यासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत.
अनेकांनी कॉलेज प्रवेश रद्द केल्यानंतर त्यांना चौथ्या यादीत अर्ज करून प्रवेश घेता येणार होता. मात्र, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चौथ्या फेरीसाठी फॉर्म भरता येत नसल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत.
यासाठी त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर लांबच लांब रांग लावलेली पाहायला मिळाली. तरीही या कार्यालयातील अनेक जण रजेवर, तर काही जण शिक्षण उपसंचालक बैठकीसाठी बाहेरगावी असल्याने अशा संभ्रम अवस्थेत कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे दाद कुणाकडे मागायची असा संतप्त सवाल पालक आणि विद्यार्थी करत आहेत.
दरम्यान, अगोदरपासूनच विद्यार्थ्यांना या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. प्रवेश प्रक्रियेसाठी तारीख वाढवूनही देण्यात आली. मात्र घोळ अद्याप मिटलेला नाही.