अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2017 07:54 AM (IST)
मुंबई : बऱ्याच सावळ्या गोंधळानंतर अखेर अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी आज मध्यरात्री जाहीर झाली. ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या यादीत नाव आले आहेत, अशा विद्यार्थ्यांना 11 ते 13 जुलै दरम्यान आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. शिक्षण विभागाकडून काल संध्याकाळी 5 वाजता गुणवत्ता यादी जाहीर होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही यादी जाहीर होऊ शकली नव्हती. यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये 95 ते 100 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने मुंबईतील कॉलेजच्या कट ऑफमध्ये 4 ते 8 मार्कांची वाढ दिसून येईल. त्यामुळे 80 ते 90 टक्के एवढे गुण मिळवूनसुद्धा विद्यार्थ्याला आपल्या आवडीच्या कॉलेजेससाठी एक-एक मार्कांसाठी कसरत करावी लागत आहे. आयसीएसई आणि सीबीएसईचा यंदाचा निकाल चांगला लागण्याने त्याचा फटकाही एसएससीच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे एकीकडे टॉप आवडत्या कॉलेजेसची क्रेज आणि दुसरीकडे मार्क्स चांगले असूनही टॉप कॉलेजसाठी करावी लागणारी कसरत, यामुळे अनेक विद्यार्थी आपल्याला मिळालेल्या पहिल्या लिस्टमध्ये लागलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा की दुसऱ्या राऊंडमध्ये प्रयत्न करावा, याविषयी संभ्रमात असण्याची शक्यता आहे.