मुंबई : वांद्र्यात आग लागेलल्या एमटीएनएलच्या इमारतीमधून जवळपास सर्व कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती, स्थानिक आमदार आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. 100 जणांना आगीच्या कचाट्यातून वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.


एमटीएनएल इमारतीला काल (22 जुलै) दुपारी तीनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला भीषण आग लागली. या इमारतीच्या गच्चीवर सुमारे 100 जण अडकले होते. आग एवढी भीषण होती की परिसरात सगळीकडे काळ्या धुराचे लोट दिसत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं आणि उशिरापर्यंत अडकलेल्या सगळ्यांना सुटका केली.

एक कोटींचा रोबो अपयशी
अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या रोबोच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम सुरु होतं. परंतु एमटीएनएल इमारतीला लागलेली आग विझवताना हा रोबो अपयशी ठरल्याचं दिसून आलं. अपेक्षेप्रमाणे ज्याठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी जाऊन रोबोने आग विझवली पाहिजे होती. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. आग विझवण्यासाठी हा रोबो जिन्याने निघाला होता. मात्र सुरुवातीलाच तो पायऱ्यावरच अडखळला. त्यामुळे आग विझवण्यासाठी मुंबई महापालिकेने खरेदी केलेल्या एक कोटींच्या रोबोच्या रुपाने मुंबईकरांच्या पैशांचा धूर झाला असंच म्हणावं लागेल.