मुंबईः शहरात नॉन स्टॉप बॅटिंग करणाऱ्या पावसाने मिलिमीटरची सेंच्युरी पूर्ण केली आहे. सांताक्रूझ वेधशाळेच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात मुंबईत 115.2 मिमी पाऊस पडला आहे. तर कुलाबा वेधशाळेनं 58.2 मिमी पावसाची नोंद केली आहे.

 

जून महिन्यात मुंबईमध्ये सरासरी 523 मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत मुंबईतल्या पावसाने 380 मिमीचा पल्ला गाठला आहे. यंदाच्या पावसाळ्यात वरूणराजाची मुंबईवर अशीच कृपादृष्टी असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

 

धरणांच्या पाणी पातळीत वाढ

मुंबईत पावसाने धरण क्षेत्रातल्या परिसरातही बरसायला सुरुवात केली आहे. शुक्रवार रात्रीपासून मुसळधार पाऊस धरणांमध्येही बरसू लागला आहे. त्यामुळे एका दिवसात तब्बल 657 दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे. पाणीटंचाईच्या काळात ही वाढही समाधानकारक असल्याचे मत पालिका प्रशासनानं व्यक्त केलं आहे.

 

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईतील विहार तलावात 88 मिमी आणि तुळशी तलावात दिवसभरात 140 मिमी पावसाची नोंद झाली आहे.