Measles Outbreak in Mumbai: मुंबईत गोवर (Measles) आजाराचा उद्रेक वाढत असून बालकांमध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कस्तुरबा रुग्णालयातील गोवरवर उपचार घेत असलेल्या एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. या बालकाची प्रकृती चिंताजनक होती. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बालकाचा मृत्यू झाला आहे.
मागील दोन महिन्यात मुंबईत गोवरचे 80 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. महापालिकेकडून गोवरचा उद्रेक झालेल्या विभागात विविध उपाययोजनेला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित रुग्णांना जीवनसत्व अ दिले जात आहे. आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जात आहे. मुंबई महापालिका रुग्णालयात गोवर बाधित बालकांवर उपचार केले जात आहेत.
मुंबई महापालिकेने मृत्यू लपवला?
मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षाच्या बाळाला फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग झाला होता. उपचारासाठी बालकाला शुक्रवारी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्यानं शनिवारी दुपारी बालकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, काल सोमवारी दुपारी 3 वाजता त्याची प्राणज्योत मालवली. कस्तुरबा रुग्णालयात 6 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. एकूण 61 रुग्णांवर वॉर्ड आणि अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मुंबई महापालिकेकडून रुग्णांची आकडेवारी दिली जाते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मृत्यू होऊनही अहवालात याची माहिती नसल्याने महापालिकेकडून मृत्यू लपवण्याचा प्रयत्न झाला का, याची चर्चा सुरू झाली आहे.
गोवरची लक्षणे काय?
गोवरची प्रमुख लक्षणे 7 ते 14 दिवसांत दिसतात. यामध्ये 104 अंशांपर्यंतचा ताप, खोकला, सर्दी, लाल डोळे किंवा पाणीदार डोळे होणे. गोवरची सुरुवातीची लक्षणे दिसतात. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होतात. त्याच वेळी, 3 ते 5 दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात. गोवरची पुरळ मुलाच्या चेहऱ्यावर, मानेवर, हातांवर, पायांवर आणि तळव्यांना येऊ शकतात.
अशी घ्या काळजी
गोवरपासून संरक्षणासाठी मूल लहान असतांना गोवर लसीचे 2 डोज दिले जातात. लस घेतलेल्या मुला मुलींमध्ये गोवर होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे आहे.गोवर झाल्यानंतर केवळ त्याची लक्षणे नियंत्रित करून उपचार केले जातात. गोवरची लक्षणे मुला- मुलीं मध्ये आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करा.संक्रमित मुलाजवळ दुसऱ्या मुला मुलीने जाणे टाळावे. पाणी आणि फळांचा रस पिण्यास द्या. आपल्या स्वच्छतेची काळजी घ्या. बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवावेत.