Corona Second Wave: कोरोनाचं सावट दिवसागणिक अधिकच गडद होत असताना मुंबईत या संसर्गातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा काही अंशी दिलासा देऊन जात आहे. यातच आता मुंबईकरांच्या दृष्टीनं आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांमध्ये याउलट चित्र पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उच्चभ्रू इमारतीतील अनेक नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याचं दिसत होतं. त्यानंतर आता याच उच्चभ्रू इमारतींतील रहिवाशांची कोविडविरोधातील रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे. तर, याउलट चित्र झोपडपट्टी भागात दिसत आहे. झोपडपट्ट्यांमधील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
तिसऱ्या सेरो सर्वेक्षणात हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. तिसऱ्या सेरो सर्वेक्षणात 24 विभागांमधील 10 हजार 197 नागरिकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी झाली. त्यात 36.30 टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा निष्कर्ष आहे. असं असलं तरीही कोरोनाबाबतची सावधगिरी मात्र काटेकोरपणे बाळगली जाणं अपेक्षित आहे.
एकिकडे मुंबईतील काही भागांत नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असतानाच दुसरीकडे शहरात नव्या कोरोनाबाधितांची नोंद होण्याचा वेग मंदावला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढली होती. पण आता मात्र कोरोना रुग्ण वाढीचा दर हा गेल्या पंधवड्यात निम्म्यावर आला आहे. मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
CoronaVirus in Mumbai | मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढला; नव्या रुग्णांमध्ये घट
देशात कोरोनाची दुसरी लाट ही मार्च महिन्याच्या शेवटी सुरू झाली. महाराष्ट्र राज्यातील मोठी शहर मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान घातलाय. यात मुंबईची रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढली एके दिवशी तर दिवसाला11 हजारवर रुग्ण संख्या येत होती. पालिकेने एका रुग्णामागे जास्त लोक पॉझिटिव्ह होऊ लागले. पण आता मुंबईतील कोरोनाचा आकडा स्थिरावला आहे.