मुंबई : कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं कधीही फायद्याचं. याचमुळं अगदी सहजपणे आजाराशी दोन हात करता येतात. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य अन्नपदार्थांचं सेवन आणि व्हिटॅमिन C चा आहारातील समावेश. C व्हिटॅमिन शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतो. संत्र आणि लिंबू यांव्यरिक्त इतरही अशी फळं आहेत, ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन C चं प्रमाण अधिक आहे. कोरोना काळात व्हिटॅमिन C चं महत्त्वं अधिक प्रकर्षानं समोर आलं आणि त्याचं प्रमाण असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाकडेही कल वाढला. चला नजर टाकूया अशाच काही फळांवर, ज्यामध्ये व्हिटॅमिन C आढळून येतं. 


कोरोना काळात घरच्या घरी बनवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी 'ही' 3 पेय


आंबा- फळांचा राजा म्हणजेच आंबाही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतो. साधारण मध्यम स्वरुपातील आंबा 122 मिलीग्राम व्हिटॅमिन C देतो. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं. 


पपई- सर्व ऋतूंमध्ये मिळणारं हे फळ. पचनशक्ती सुधारण्यासाठी पपई अतिशय फायद्याचा. या फळात व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असतं. एका पपईच्या सेवनाने 88 मिलीग्रॅम पोषक तत्त्व मिळतात. 


स्ट्रॉबेरी- व्हिटॅमिन C या आणखी एक चांगला स्त्रोत म्हणजे स्ट्रॉबेरी. या फळात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सिडंट असतात. एक कप स्ट्रॉबेरीच्या सेवनातून तुम्हाला 100 मिनीग्राम व्हिटॅमिन C मिळतं. 


अननस- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच अननस हाडं मजबूत करण्यासाठीही फायद्याचा ठरतो. यामध्ये अनेक व्हिटॅमिन असल्याची बाब समोर आली आहे. एका अननसाच्या सेवनाने 79 मिलीग्रॅम व्हिटॅमिन C मिळतं. 


किवी- एका किवीमध्ये जवळपास 85 मिलीग्रॅम व्हिटॅमिन C असतं. याशिवाय व्हिटॅमिन के आणि ई यांनीसुद्धा हे फळ परिपूर्ण आहे. आरोग्यासाठी हे फळ अतिशय लाभदायी आहे.