मुंबई : जीएसटीच्या मंजुरीसाठी राज्य सरकारचं तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. मात्र जीएसटीमुळे एलबीटीसोबतच जकात बंद झाल्यास मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल अशी शंका शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत व्यक्त केली.

जकात बंद झाल्यास गाड्यांचं चेकिंग होणार नाही. त्यामुळे सरसकट सर्व गाड्या मुंबईत येतील. परिणामी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती सुनिल प्रभूंनी व्यक्त केली.

मुंबईच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार विशेष लक्ष देणार आहे, सुरक्षेबाबत नव्या उपाययोजना आखण्यात येतील, अशी हमी यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली.

राज्यातील अनेक करांमध्ये केंद्रीय जीएसटीनुसार सुधारणा केली जाणार आहे. मात्र यामुळे महानगरपालिका आणि नगरपालिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची ग्वाहीसुद्धा मुनगंटीवार यांनी दिली.