'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या
एबीपी माझा वेब टीम | 21 May 2017 02:10 PM (IST)
फोटो सौजन्य : एएनआय
मुंबई : भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट हायटेक ट्रेन तेजस एक्स्प्रेस सोमवारपासून रुळांवर धावणार आहे. पण त्याआधीच या ट्रेनवर समाजकंटकांची वाकडी नजर पडली आहे. या ट्रेनच्या काचा फोडल्याचं आता समोर आलं आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पातील तेजस एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा, उद्या सोमवार (22 मे) रोजी होणार आहे. पण यापूर्वीच या ट्रेनवर दगडफेक करुन त्याच्या काचा फोडल्याचं समोर आलं आहे. दिल्लीकडून मुंबईकडे ही ट्रेन घेऊन जात असताना त्याच्या काचा फोडल्या असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोकण आणि गोवावासियांसाठी पर्वणी ठरणारी तेजस एक्स्प्रेस सध्या मुंबईत दाखल झाली आहे. अगदी आरामदायक आणि जलद असणारी ही गाडी कोकणवासियांचा वेळ वाचवणार आहे. केवळ साडे आठ तासात मुंबई ते गोवा हा पल्ला गाठता येणार आहे. तेजस ट्रेन ताशी 200 किमी प्रतितास वेगाने धावणार असून, देशातील ही पहिली ट्रेन असेल. तसेच याच्या निर्मितीसाठी रेल्वेने तब्बल 3 कोटी 25 लाख रुपये खर्च केले आहेत. पण या ट्रेनला समाजकंटकांनी लक्ष्य केल्याचं समोर आलं आहे. संबंधित बातम्या मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!